नको फुकुशिमा, नको चेर्नोबिल!

नको फुकुशिमा, नको चेर्नोबिल!

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करा!!

अणुऊर्जा घातक आहे! अणुऊर्जेला विरोध करुया!

जगातील आज पर्यंतच्या सर्वात मोठ्या अणुअपघातांपैकी एक, जपान मधील फ़ुकुशिमा दाईची अणुप्रकल्पात घडला आहे. ११ मार्च २०११ रोजी झालेल्या मोठ्या भूकंपातून सुनामी आणि अनेक घटनांची एक साखळी तयार झाली ज्यातून या प्रकल्पातील संयंत्र-१ आणि संयंत्र-३ मध्ये मोठे स्फोट झाले. संयंत्र-३ मध्ये तर प्लुटोनियम इंधन होते, जे युरेनियम या नेहमीच्या इंधनापेक्षाही धोकादायक आहे कारण प्लुटोनियम २ लाख वर्षांपेक्षा जास्त काळ किरणॊत्सर्ग करत राहते. प्लुटोनियमच्या १ ग्रॅमपैकी १० लाखावा भाग जरी श्वासाद्वारे गेला तरी फुफ्फूसांचा कॅन्सर होतो. जपानी सरकार चेर्नोबिल सारखा अपघात होऊ नये यासाठी अगतिकतेने प्रयत्न करत आहे पण अगोदरच मोठ्या प्रमाणात  किरणोत्सर्ग या प्रकल्पातून वातावरणात सोडला गेलेला आहे. याशिवाय अजून २ प्रकल्पातील ४-५ अणुभट्ट्यांनाही नुकसान झालेले आहे, त्यांची शितकरण यंत्रणा बंद पडली आहे आणि या प्रकल्पांतूनही मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग सोडला गेला आहे. प्रकल्पाजवळील २ लाखांपेक्षा जास्त लोकांना हलवण्यात आले आहे. ही कदाचित फक्त सुरूवात आहे. शेवटी, अनेक महिन्यांनी कदाचित जर हे लोक घरी गेलेच, तर ते या जाणिवेसकटच परत जातील की ते किरणोत्सर्गाने प्रदूषित वातावरणात जगणार आहेत!

अणुऊर्जा अपघात: एक वास्तव

अणुभट्टीमध्ये युरेनियम इंधनाच्या अणुचे विभंजन करून प्रचंड ऊर्जा उत्पन्न केली जाते. या ऊर्जेद्वारे पाण्याची वाफ करुन, त्याद्वारे जनित्र फिरवले जाते आणि जनित्रातून वीज उत्पन्न होते. या विभंजन प्रक्रीयेमध्ये २०० पेक्षा जास्त अतिशय किरणोत्सर्गी पदार्थ तयार होतात. यामुळेच १००० मेगावॅटच्या अणुभट्टीत १००० हिरोशिमा अणुबॉम्बइतका किरणोत्सर्ग तयार होत असतो. यापैकी अनेक किरणॊत्सर्गी पदार्थ येणारी हजारो वर्षे किरणोत्सर्ग करत राहणार. या किरणोत्सर्गाचा मानवी शरीरावरील परिणाम अतिशय घातक आहे: यामुळे कॅन्सर, पुनरुत्पादक पेशींवर परिणाम होऊन जन्मजात विकलांगता, नपुंसकता, बालवयात वृद्धत्व, किडनीचे विकार आणि इतर अनेक विकार होतात!

अणुऊर्जेच्या अशा अत्यंत जटील स्वरूपामुळेच अणुभट्ट्यांमध्ये अपघाताची शक्यता कायम असते. कितीही सुरक्षा उपकरणे वापरली तरी ती पुरेशी नसणार. जर मोठा अपघात झालाच आणि किरणोत्सर्गी पदार्थ वातावरणात सोडले गेले तर ते हजारो वर्षांकरिता मोठ्या प्रमाणात भूभाग मानववस्तीस अयोग्य करू शकतात. उत्तर युक्रेनमधील चेर्नोबिल येथील संयंत्र ४ मध्ये, २६ एप्रिल १९८६ रोजी हेच घडले. उत्तर गोलार्धातील जवळपास सर्व देशांमध्ये या अपघाताचे किरणोत्सार पसरले आहेत.

  • १ लाख वर्ग मैलापेक्षा जास्त भाग (जवळपास महाराष्ट्राएवढा) किरणोत्सर्गाने प्रदूषित झाला आहे आणि येणारी हजारो वर्षे तसाच राहील.
  • ४ लाखापेक्षा जास्त लोक तिथून हलवले गेले आहेत, परंतु इतरही लाखो लोक त्या भागात अजूनही राहतात, हे जाणून की त्यांना कधीही कॅन्सर होऊ शकतो, त्यांच्या मुलांना किंवा नातवांना आणि पुढच्या पिढ्य़ांना जन्मजात विकलांगता असू शकते.
  • अमेरिकन विज्ञान अकादमीच्या २०१० च्या अहवालानुसार १० लाखापेक्षा जास्त लोक आजपर्यंत या अपघाताच्या नंतर झालेल्या परिणामांमुळे मृत्यूमुखी पडले आहेत आणि हा आकडा वाढतच राहणार आहे.

जागतिक अणुऊर्जा उद्योगाने, जगातील सर्व अणुविभागांच्या संगनमताने या अपघाताची तीव्रता कमी करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चेर्नोबिल नंतर पश्चिम युरोपातील अनेक देशांनी अणुऊर्जेवर बंदी घातली( आणि अमेरिका आणि कॅनडा मध्ये नवीन प्रकल्पांना मागणीच बंद झाली) पण फ़्रान्स, जपान, अमेरिकेसारख्या काही देशांनी असलेले अणुप्रकल्प चालू ठेवले; शिवाय फ्रान्स, फिनलंड, जपान यांनी तर नवीन अणुभट्ट्याही बांधल्या. त्यांनी असा दावा केला की घ्यायचे ते धडे घेऊन झाले आणि यापुढे भविष्यात असे अपघात टाळले जातील, त्यांच्या अणुभट्ट्या पुरेशा मजबूत असून त्या दहशतवादी हल्ले, सुनामी, भूकंप या सर्वांना तोंड देऊ शकतील. ११ मार्चच्या भूकंपाने हे सर्व दावे निकालात काढले आहेत.

फुकुशिमा प्रकल्प जपानच्य मुख्य बेटावर, राजधानी टोकीयो पासून फक्त २४० किमी अंतरावर आहे. वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्यांवरून स्पष्ट आहे की जपानी अणुविभाग या अपघाताच्या तीव्रतेला कमी करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. सत्य हे आहे की अणुऊर्जा उद्योगासोबत संगनमत करून, त्यांच्या नफ्यासाठी फ्रान्सच्या राजकीय नेत्यांनी जपानी भूमी येणाऱ्या हजारो वर्षांकरिता किरणोत्सर्गाने प्रदूषित करून टाकली आहे. जपानची इतर बेटेही खूप मोठ्या काळासाठी किरणोत्सर्गाचे परिणाम भोगत राहतील. याचा परिणाम कोरिया, चीन, रशिया आणि तैवान या शेजारच्या देशांवरही झाल्यावाचून राहणार नाही. अणुऊर्जेचा पर्याय निवडून जपानी नेतृत्वाने त्यांच्या देशाला अपरंपार हानी पोहोचवली आहे आणि जपानी लोक व त्यांच्या अनेक भावी पिढ्या याची किंमत आरोग्याचा बळी देऊन चुकवत राहणार आहेत.

अणुऊर्जा घातक आहे

अणुभट्ट्या नेहमीप्रमाणे काम करत राहिल्या, तरी त्यांचे पर्यावरणावरील परिणाम भयानक आहेत. अणुभट्ट्य़ांजवळ राहणाऱ्या लोकांना किरणोत्सर्गाला तोंड द्यावेच लागते: अणुभंजनानंतर तयार झालेले अनेक किरणॊत्सर्गी पदार्थ पर्यावरणात अनेक मार्गांनी निसटतातच. त्यामुळेच अणुप्रकल्पाजवळ राहणारे लोक आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्या मोठ्या दराने कॅन्सर, जन्मजात मानसिक आणि शारिरिक व्यंग, बालपणात वॄद्धत्व आणि इतर अनेक घातक विकारांचे येणारी हजारो वर्षे शिकार होत राहणार!

यापेक्षाही भयावह प्रश्न आहे तो अणुकचऱ्याचा. प्रत्येक १००० मेगावॅटचा अणुप्रकल्प ३० टनापेक्षा जास्त अणुकचरा दरवर्षी निर्माण करतो. या कचऱ्यात प्लुटोनियम आणि टेक्निटियम सारखे घातक पदार्थ असतात आणि तो २ लाख वर्षे किरणोत्सर्गी राहतो. या कचऱ्याला साठवण्याची कुठलीही सुरक्षित पद्धत उपलब्ध नाही. सर्वसाधारणपणे तो अणुप्रकल्पाजवळच कुठेतरी तात्पुरत्या जागी साठवला जातो. प्रत्येक ठिकाणी हा कचरा गळत आहे, जमिनीतून भूजलामध्ये मिसळत आहे, नदीच्या पाण्यात आणि समुद्रात जाऊन मिसळत आहे आणि त्याद्वारे शेवटी प्राणी, वनस्पती, मानवापर्यंत जात आहे. याचे परिणाम आपल्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहेत!

आणि जर अपघात झालाच … चेर्नोबिल नंतरच्या, अणुभट्टीचा विनाश नशिबानेच बचावला अशा अनेक थोडक्यात हुकेलेल्या घटनांकडे बघता, डॉ. हेलेन कॉल्डीकॉट सारख्या अणुऊर्जाविरोधी कार्यकर्त्यांनी नेहमीच सांगितले आहे की सांख्यिकदृष्ट्या बघता आज ना उद्या चालू असलेल्या ३३ देशातील ४३८ अणुऊर्जाप्रकल्पांपैकी कुठेतरी अणुअपघात होणारच आहे. आणि चेर्नोबिलच्या २५ वर्षांनंतर असा अपघात आता झाला आहे!

भारत … त्याच विनाशकारी मार्गाने

अणुऊर्जा स्वच्छ, सुरक्षित आणि हरित आहे, देशाच्या ऊर्जा प्रश्नाचे उत्तर आहे असा प्रचार करत भारत सरकार जगातील सर्वात मोठा ९९०० मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प माडबन(जैतापूरजवळ, रत्नागिरी जिल्ह्यात) लावू बघत आहे. फ्रान्सची कुप्रसिद्ध अरिवा कंपनी इ.पी.आर. बनावटीच्या १६५० मेगावॅटच्या दोन अणुभट्ट्या सुरूवातीला उभारणार आहे आणि ४ अजून अणुभट्ट्या नंतर उभारणार आहे. आजच्या ४५६० मेगावॅट पासून २०३२ पर्यंत ६३,००० मेगावॅटपर्यंतच्या भारत सरकारच्या अणऊर्जा निर्मितीच्या हनुमानऊडीचाच हा प्रकल्प एक भाग आहे. असे अजूनही अनेक महाप्रचंड ऊर्जा प्रकल्प पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातमध्ये किनारपट्टीवर प्रस्तावित आहेत.

भारताच्या धोकादायक अणुभट्ट्या

जगभरातील अनेक अणुतज्ञांनी भारतातील अणुभट्ट्यांना ’जगातील सर्वाधिक असुरक्षित’ संबोधिले आहे. आजपर्यंत भारतातील अणुभट्ट्यांमध्ये ३०० पेक्षा जास्त अपघात झालेले आहेत. यापैकी काही, जसे उत्तरप्रदेशातील नरोरामधील १९९३चा अपघात, किंवा काक्रापार मधील १९९४ मध्ये अणुभट्ट्यांमध्ये घुसलले पाणी हे अतिशय गंभीर अपघात होते. भारतीय अणुभट्यांमधून होणाऱ्या नियमित आणि अपघाती किरणोत्सर्गाच्या अपसर्गाने आजूबाजूच्या गावातील लोकांमध्ये जन्मजात व्यंग, थायरॉईड व्यंग, गळू, पुनरुत्पादनाचे प्रश्न दिसून आले आहेत.

या वाईट इतिहासानंतरही भारतातील अणुप्रतिष्ठान अवाढव्य आकाराच्या इ.पी.आर. अणुभट्ट्या फ्रान्सकडून आयात करत आहे. या अणुभट्ट्या आपल्या आजच्या अणुभट्ट्यांपेक्षा जास्त असुरक्षित आहेत. अमेरिकेतील आणि इंग्लंडमधील अणुसुरक्षा संस्थांनी या तंत्रज्ञानाच्या सुरक्षेबद्दल अगोदरच प्रश्न उपस्थित केलेले आहेत. प्रस्तावित जैतापूर अणुप्रकल्पामुळे जगातील सर्वोत्तम १० जैवविविध्यपूर्ण असलेल्या या भागातील विशिष्ट जीवसृष्टी नष्ट होईल. त्याच्या शितलीकरण प्रणालीमुळे आणि गरम पाणी समुद्रात सोडल्यामुळे समुद्रातील पर्यावरण, माशांचे बीजीकरण आणि मत्स्यसंपदा नष्ट होईल.

जणूकाही हे सर्व कमी आहे म्हणून, जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प भूकंपप्रवण अशा किनारपट्टीवरच्या जागी उभारला जात आहे. जपानी अणुअपघाताच्या अगोदर, भारतीय अधिकारी जपानचेच उदाहरण देऊन म्हणत की भूकंपप्रवण देश जर अणुभट्ट्या सुरक्षितपणे चालवू शकतात, तर भारतही करू शकतो.

जैतापुर-माडबन येथे जर असा मोठा अपघात झालाच, २५ वर्षात फक्त एकदाच जरी झाला तरी, अनेक किमी पर्यंतचा भूभाग निर्मनुष्य करावा लागेल, आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र – पुण्यासकट – किरणोत्सर्गाने दूषित होऊन जाईल! कायमस्वरूपी! फुकूशिमाच्या अनुभवानंतरही आपण हे होऊन देणार का?

उर्जा समस्येवर पर्यायी उपाय

जपानच्या लोकांना कटू अनुभवातून धडा मिळाला आहे. जे तंत्रज्ञान इतके विनाशकारी आहे, ते शाश्वत विकासाचा मार्ग कसे असू शकते? खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत विकास साधू शकणारा, देशाच्या ऊर्जा प्रश्नावर आणि भविष्यातील गरजांवर उपाय आहे की: ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे आणि पुन्हा निर्माण होऊ शकणाऱ्या ऊर्जा स्त्रोतांचा वापर. उत्पादन, वाहन आणि वापर या तिन्ही ठिकाणी विजेची कार्यक्षमता वाढवणे, अनावश्यक ऊर्जा वापर टाळणे या मार्गांनी ऊर्जेची गरजच ३०-४०% इतक्या प्रमाणात कमी होऊ शकते. यातून सर्व देशातील ऊर्जेची २०% असलेली कमतरता फक्त भरूनच निघणार नाही, तर येणारी काही वर्षे नवीन प्रकल्पही लागणार नाहीत. आपल्या भविष्यातील गरज नंतर पुन्हा उत्पादित करण्याजोग्या ऊर्जा स्त्रोतांपासून पूर्ण होऊ शकतील. सरकारही मानते की अशा स्त्रोतांची क्षमता आहे — पवन ऊर्जा -४८,५०० मेगावॅट, लघू जल विद्युत-१५,००० मेगावॅट, बायोमास ऊर्जा-२१,००० मेगावॅट आणि कमीत कमी ५०,००० मेगावॅट सौर ऊर्जे पासून. खरी क्षमता तर फार जास्त आहे. याशिवाय अणुऊर्जेची किंमत जिथे वाढतच चालली आहे, पर्यायी ऊर्जा स्त्रोतांची किंमत कमी होत आहे. पवन ऊर्जा आजही पारंपारिक ऊर्जेपेक्षा स्वस्त आहे आणि २०१५-२० पर्यंत सौर ऊर्जाही त्यापेक्षा स्वस्त होईल हा अंदाज आहे. आज जरी बांधकाम चालू केले तरी अणुप्रकल्प उभा व्हायला कमीत कमी १० वर्षे लागतात. तोपर्यंत तो परवडणारा राहणारच नाही.

भारताने अणूऊर्जेला प्रोत्सासन देण्यामागचे खरे कारण

असे असताना मग भारतातील राज्यकर्ते अणूप्रकल्प उभा करण्याचा वेडेपणा का करत आहेत? एक महत्वाचे कारण: विदेशी आणि भारतातील मोठमोठ्या कंपन्यांना अवाढव्य नफा कमवण्याची मोठी संधी देणे! १९९१ साली जागतिकीकरणाची धोरणे लागू झाल्यानंतर आलेल्या सर्व सरकारांनी भारतीय अर्थव्यवस्थेला एकाच कारणासाठी चालवले आहे –  मोठमोठ्या देशी-विदेशी उद्योगधंद्यांचा नफा वाढवण्यासाठी. त्यासाठी सेझ, शासकीय कंपन्यांचे आणि वित्तीय संस्थांचे कवडीमोल भावाने खाजगीकरण, खनिजे संपत्त्तीसाठी पर्वत, जंगले आणि नद्या लूटण्याचे स्वातंत्र्य, त्यासाठी लाखो लोकांचे विस्थापन, आपले शिक्षण, आरोग्य आणि इतर आवश्यक सेवांवर कब्जा करून नफा कमवण्याची परवानगी अशा गोष्टी भारत सरकार करत आहे. पश्चिमेकडील देशांमध्ये अणुऊर्जेला ओहोटी आलेली असल्यामाळे तेथील कंपन्या आशियाकडे, विशेषत: भारत आणि चीनकडे नजर लावून आहेत. त्यामुळेच मनमोहन सिंग सरकारने देशात अणुऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. यातून विदेशी कंपन्या आणि त्यांचे भारतातील साथीदार कंपन्या यांना १५० अब्ज डॉलरचा धंदा मिळणार आहे! भारतीय शासकांनी त्यांचा आत्मा दानवी शक्तींना लज्जास्पद रितीने विकून टाकला आहे!

मित्रहो,

जैतापुर भागातील कोकणच्या लोकांनी अरिवाच्या प्रकल्पाविरुद्ध एक झुंजार लढा उभारलेला आहे. भारत सरकारने लोकांचा विरोध चिरडून टाकण्यासाठी एक हुकूमशाही हल्ला चढवला आहे. लाठीमार, अनिर्बंध अटका, खोट्या केसेस असे प्रकार अवलंबिले जात आहेत. आघाडीच्या कार्यकर्त्यांना रत्नागिरी जिल्हाबंदीचे आदेश निघालेले आहेत. देशाचे अनेक प्रतिष्ठीत नागरिक ज्यांच्यामध्ये निवॄत्त न्यायमूर्ती, शिक्षणतज्ञ, वैज्ञानिक सामील आहेत, त्यांनाही जिल्हाबंदी करण्यात आली आहे.

माडबन आणि परिसरातील लोक त्यांची जिवीका, येणाऱ्या पिढ्यांचे आरोग्य आणि पर्यावरण वाचवण्यासाठी लढत आहेत. महाराष्ट्राचे काश्मिर असे कोकण वाचवण्याचा हा लढा आहे. कोकण आपल्या सर्वांचा आहे, तेव्हा त्यांच्या लढ्याला आपण पाठींबा दिलाच पाहिजे. तरूण आणि वृद्ध, विद्यार्थी आणि शिक्षक, कामगार आपण सर्वांनी मिळून या लढ्यात सामील झालेच पाहिजे आणि भारत सरकारकडे मागणी केली पाहिजे की:

  1. जैतापुर अणुऊर्जा प्रकल्प रद्द करा! सर्व अणुऊर्जा प्रकल्प बंद करा!!
  2. जैतापूर भागातील दहशतीचे राज्य बंद करा
  3. ऊर्जा बचत आणि पुन्हा वापरता येणाऱ्या तंत्रज्ञामध्ये मोठी गुंतवणूक करा

या मागण्यांसाठी आयोजित खालील कार्यक्रमात मोठ्या संख्येने सामील व्हा:

कार्यक्रम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

जैतापूर अणुप्रकल्प रद्द व्हावा या मागणीसाठी

दिनांक: १७ मार्च २०११, गुरूवार

वेळ: सकाळी ९ ते ११

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: